अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने यंदाही स्वच्छ भारत अभियानात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी शहरात अनेक जनजागृती उपक्रम राबवले. शहरातील अस्वच्छतेची परिस्थिती पाहता नगरपालिकेचे स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. नगरपालिका शहर स्वच्छ असल्याचे पोकळ दावे करत असले तरी, शहरातील महत्त्वाचे आणि सर्वाधिक वर्दळीचे भाग अस्वच्छतेचे आगार बनले आहेत. अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजी चौकात अंबरनाथ नगरपालिकेने नुकतेच मेघडंबरीसारखी वास्तू तयार करत, चौकाची शोभा वाढवली आहे. या भागात सिमेंट-काँक्रीट रस्ते आणि इतर सुशोभिकरण नगरपालिका करत आहे. मात्र केवळ सशोभिकरण करण्यावरच नगरपालिका समाधानी असल्याचे दिसत आहे. शिवाजी चौकातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वाहनालाच फेरीवाले विळखा घालून बसल्याचे चित्र दिसते. गेल्या काही दिवसांपासन रात्री उशिरापर्यंत शिवाजी चौकाला घेराव घालणाऱ्या फेरीवाल्यांकडून रात्री उशिरा सर्व माल विक्री झाल्यावर उर्वरित भाजीपाला, फळे, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच या भागांत विक्रीसाठी असणारे विविध खाद्यपदार्थ थेट शिवाजी चौकाच्या मध्यभागी आणि आकर्षक मेघडंबरीच्या समोरच टाकले जात आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासह नगरपालिकेने शिवाजी चौकात रात्रीही कर्मचारी नेमण्याची मागणी केली जात आहे. .
फेरीवाल्यांकडून पसरवली जाते अस्वच्छता